नवरात्र उत्सव

     इ.स. १९७९ सालापासून देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. नवरात्र उत्सवाच्या वेळेस पहिल्या दिवसापासुन पहाटे पाच वाजता ब्राह्मणाच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजा. व आरती कली जाते. तसेच देवीला नवरात्राच्या दिवसात नवीन पितांबर नेसवली जाते. पहाटे पाच वाजेपासून सर्व गावकरी व बाहेरगावहून आलेले शेकडो भक्त दररोज पहाटे आरतीला उपस्थित असतात व आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन आपली गाऱ्हाणी मातेसमोर मांडतात. मंदिराच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरण पूर्णत: भक्तिमय होऊन जाते. इतर दिवसही असंख्य भक्त देवीला नवस मागण्यासाठी व फेडण्यासाठी दुरवरून येत असतात.
     धनदाई मातेचे आज जे वैभव दिसते. यापेक्षाही वैभवशाली देवालय हजारो वर्षांपूर्वी येथे अस्तित्वात होते, याची साक्ष मंदिराच्या परिसरातील भग्न अवस्थेतील असलेल्या काही शिल्पांवरून पटते. पूर्वी याठिकाणी भव्य, वैभवशाली, प्राचीन, कलाकुसरेने नटलेले दगडी मंदिर असावे, असा विश्वास आहे. कारण मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळेस याठिकाणी अनेक जीर्ण अवस्थेतील शिल्प आढळून आले. त्याचप्रमाणे १२ फुटी भव्य दीपमाळही अस्तित्वात होती. त्यावर कोरीव काम केलेले देखावेही होते. मोडी लिपीत काही संदेशही होते. पण आधुनिक मंदिर व सभागृह बांधतांना ती दीपमाळ (स्तंभ) हलविणे आवश्यक होते. पण पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने तो दीपस्तंभ हलविताना भंग पावला व त्याचे अनेक तुकडे झाले. पुरातन कालीन वैभवाची साक्ष देणारा अमूल्य ठेवा नष्ट झाला. त्याचे शल्य आजही गावकऱ्यांना व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आजही बोचत आहे. असेच वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याची जिद्द गावकऱ्यांमध्ये व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे व अनेक भक्तही यासाठी मदत करतील.
     सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करीत एकसष्ट कुलांचे रक्षण करीत युगानुयुगे कुलस्वामिनी धनदाई माता येथे राहील असा भक्तांचा विश्वास आहे. मी ही कथा मातेच्या आशीर्वादाने आपल्यापर्यंत पोहचवू शकलो. त्याचप्रमाणे माता सर्व भक्तांना प्रत्येक कार्यात यश देत राहील व सुख- समृद्धीचा आशीर्वाद देत भक्तांचे कल्याण करीत राहील.

।। श्री धनदाई माता की जय ।।

पूजा व कुलाचार

श्री धनदाई देवी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी, कुलदेवता आहे. विशेष प्रसंगी कित्येक कुटुंब देवीच्या दर्शनास येतात व धन्यता पावतात. या स्थानावर देवीचे वर्षातून चार वेळा आरती लावून उत्सव साजरे केले जातात -

१) चैत्र शुद्ध अष्टमी - मुख्य यात्रा, उत्सव
२) श्रावण शुद्ध अष्टमी - आरती
३) अश्विन शुद्ध अष्टमी - नवरात्रौत्सव - आरती
४) माघ शुद्ध अष्टमी - आरती
१० दिवे > १ > १९१ पुरणाचे कणकेचे /पेढ्यांचे दिवे लावून आरती दाखविली जाते.
पुराणपोळी किंवा गोड नैवेद्य दिला जातो.